2029 ला मोदी पंतप्रधान होणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

Foto
नाशिक  : आगामी काळात देशात सत्ताबदल नक्की होणार आहे. तो आमच्यामुळे होणार नाही, काँग्रेस किंवा कोणत्या राजकीय पक्षामुळे होणार नाही. तर हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यामुळेच होईल. याला कारण त्यांचा गेल्या 12 वर्षातील कारभार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 2029 ला मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे आता चेहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

केंद्रात सत्ताबदल व्हायचा तेव्हा होईल. पण देशाचा पुढचा पूर्णवेळ शिक्षणमंत्री कोण असणार, हा मोदी सरकारच्या उर्वरित काळातील महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या शिक्षणखात्याचा चार्ज दिला आहे. त्यांच्याकडे अगोदरच तीन महत्त्वाची खाती आहेत. त्यामध्ये आता ही नवीन जबाबदारी त्यांना दिली आहे. शिक्षण खातं हे पूर्णवेळ मंत्र्याची गरज असलेलं खातं आहे, पार्टटाईम खातं नाही. त्यामुळे लवकरच मोदी देशाला चांगला शिक्षणमंत्री देतील, ही अपेक्षा आहे. देशाला अशा शिक्षणमंत्र्यांची गरज आहे, जो विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेऊ शकतो, परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करुन शकेल. ज्याला मुलभूत शिक्षणाचे प्रश्न माहिती आहेत, अशी शिक्षणमंत्र्याची गरज आहे.  मात्र, आजघडीला मोदी सरकारमध्ये तशी एकही व्यक्ती नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बढती मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, फडणवीस शिक्षणमंत्री झाले तर आम्हाला चालणार नाही, आम्ही त्याला विरोध करणार. महाराष्ट्रातही मोठ्याप्रमाणावर पेपरफुटी झाली आहे. फडणवीस शिक्षण मंत्रीपदासाठी उपयुक्त नाहीत. 

मी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाने आलो, वाटलं लवकर येईन. पण समृद्धी महामार्गावर नाशिकमध्ये येण्यासाठी कोणत्याही पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आमचा रस्ता चुकला, बरंच फिरावं लागलं. नाशिकसारख्या आधुनिक शहरात या गोष्टी झाल्या पाहिजेत. आज नाशिकमध्ये येताना खड्ड्यांचा अनुभवही घेतला. नाशिकमध्ये सहा कोटी लोक कुंभमेळ्यासाठी आले तर तेवढा भार झेपेल का, याचा विचार कोणी केलेला नाही. फक्त पैसे खाण्याचा हा विषय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.